मुंबई - शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षातील वाद वाढत चालला ( BJP VS Shiv sena in BMC ) आहे. मुंबई महापालिकेतील ( Brihanmumbai Municipal Corporation ) सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर पालिका आयुक्तांनी टनेल लाँड्री, प्राण्यांचे पिंजरे, ट्रेंचेसचे टेंडर रद्द करण्यात आली आहेत. नागरिकांच्या विकास कामांचे टेंडर रद्द होऊ लागल्याने विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. टेंडर रद्द करण्याबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे तर भाजपाने नागरिकांच्या पैशांचा चुराडा होणार असल्याने ती रद्द झाल्याचे म्हटले आहे.
टनेल लाँड्री टेंडर रद्द -मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे परेल येथील विद्युत धुलाई केंद्राचा वापर केला जातो. पालिकेच्या मालकीच्या या केंद्राची क्षमता कमी असल्याने रुग्णांचे कपडे उशिरा धुवून मिळत होते. सध्या याठिकाणी ५० टक्केच कपडे धुतले जातात. यामुळे रुग्णांना वेळेवर कपडे मिळत नव्हते. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने क्षयरोग रुग्णालयात अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची निःपक्षपातीपणे तपासणी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे.
प्राण्यांच्या पिंजऱ्यांचे कंत्राट रद्द -भायखळा येथील राणीबागेचे नूतनीकरण केले जात आहे. प्राणी आणि पक्षांसाठी नवे पिंजरे बनवले जात आहेत. दुर्मिळ प्रजातींचे प्राणी आणि इतर विकास कामे यासाठी टेंडर काढण्यात आले होते. 185 हे कंत्राट होते. त्यात नंतर 106 कोटींची वाढ होऊन ते 290 कोटींचे कंत्राट झाले होते. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.
ट्रेंचेसचे टेंडर रद्द -नागरिकांना पाणी, लाईट, केबल, इंटरनेट आदी सोयी सुविधा देण्यासाठी केबल आणि पाईपलाईनचे जाळे पसरवले जाते. त्यासाठी रस्त्यावर छोटे खड्डे करावे लागतात. नंतर हे खड्डे बुजवले जातात. यासाठी पालिकेने 570 कोटींचे टेंडर काढले होते. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक विनोद मिश्रा यांनी याबाबत तक्रार केली. यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.