मुंबई - उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला ( five states Assembly Election Result 2022 ) आहे. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात जल्लोष केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला यश मिळाले आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना ( Chandrakant Patil On Pm Narendra Modi ) सांगितले.
चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, गोवा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. त्यानंतर आता गोव्याची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिंकली आहे. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.
यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असेही पाटील यांनी सांगितले.