मुंबई -शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात शिक्षण मोफत असताना बालभारतीच्या ई साहित्यासाठी पालकांना पैसे मोजावे लागणार असल्याने राज्यात शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत आहे. असा आरोप करत बालभारतीचे ई साहित्य मोफत पुरविण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.
ई साहित्यासाठी पालकांना मोजावे लागतील पैसे
राज्य शासनाच्या बालभारतीच्या ई बालभारती विभागाकडून शैक्षणिक साहित्य निर्माण केली असून या शैक्षणिक साहित्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. नोंदणी शुल्क पन्नास रुपये, जीएसटी व इतर चार्जेस आकारले जाणार आहेत. अशी जाहिरात काल बालभारतीने प्रसिद्ध केली. वास्तविक पाहता कोरोना काळामध्ये अनेक पालकांचे रोजगार बंद झाले असून अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेणे परवडत नाही. आपल्या पाल्याला स्मार्ट फोन नेटपॅकसाठी पालकांकडे पैसे नाही. शाळांना अनुदान नाही. त्यामुळे राज्यातील अनेक शाळा चालकांनी शाळा विक्रीला काढल्या आहेत. तसेच आज शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील २ कोटी विद्यार्थ्यांच्या पालकांना बालभारतीच्या ई साहित्यासाठी पैसा मोजावे लागणार आहे.