मुंबई -राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होत असून शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हात वर करून संपूर्ण जबाबदारी शाळांवर ढकलली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता शिकवावे की मदत मागण्यासाठी दारोदार फिरावे, असा प्रश्न भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सरकारला विचारला असून तातडीने शाळांना विशेष आर्थिक निधी पुरविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
राज्यातील शाळा आर्थिक संकटात -
भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले की, शाळा सुरू करताना प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करावे, फॅन, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामिटर, औषधे, मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शाळांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यात अनेक उद्योगधंदे आधीच संकटात असून त्यांच्यासमोर शाळांनी कसा सीएसआर निधी मागावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांनी शाळा सुरू झाल्यावर मुलांना शिकवावे की निधी मागण्यासाठी दारोदार फिरावे ? असा सवालही शिक्षण क्षेत्रातून विचारला जात आहे. कोरोना काळात राज्यातील अनेक अनुदानित, विना अनुदानित तसेच सेल्फ फायनान्स खासगी व्यवस्थापनांना अनेक आर्थिक कसरत करावी लागली आहे. त्यातच शासनाने अनेक अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही तर विना अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने आधीच आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे हा खर्च कसा भागवावा या विवंचनेत शाळा आहेत.
सरकारने हात झटकले.. शिक्षकांनी शिकवायचे की दारोदार जाऊन पैसे मागायचे, भाजपा शिक्षक आघाडीचा सवाल - राज्याच्या शिक्षण धोरणावर भाजपची टीका
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होत असून शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हात वर करून संपूर्ण जबाबदारी शाळांवर ढकलली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता शिकवावे की मदत मागण्यासाठी दारोदार फिरावे, असा प्रश्न भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सरकारला विचारला आहे.
हे ही वाचा -राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार
शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू-
सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.