मुंबई -विधान परिषद निवडणूक प्रकरणी केंद्रीय यंत्रणा आमदारांना फोन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. सत्ताधारी हारण्याची कारणे शोधत असून त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी केलेला आरोपही त्यातीलच असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. नाना पटोले यांची ही बोगस स्क्रिप्ट असल्याची खिल्लीही चंद्रकांत पाटील यांनी उडवली.
महाविकास आघाडी सरकारला त्यांचे आमदार देणार धक्का -विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदारांना केंद्रीय यंत्रणांकडून थेट फोन जात असून दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे माहिती असून आपण ती योग्य वेळी पुढे आणू असा इशाराही पटोले यांनी दिला. पटोले यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पराभव आता नजरेच्या टप्प्यात दिसू लागल्याने नाना पटोले बोगस स्क्रीप्ट तयार करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला त्यांचेच आमदार धक्का देतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.