मुंबई -'एकनाथ खडसे यांचा राजीनामा अजूनही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे आलेला नाही. त्यामुळे यावर अजून काही बोलण्यात अर्थ नाही. खडसे यांच्याशी आमचे वरिष्ठ नेते बोलत आहेत. त्यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यामुळे अजून राजीनामा आलेलाच नाही तर त्यावर बोलणे योग्य नाही,' असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी अखेर भाजपाला शेवटचा रामराम ठोकला आहे. त्यांनी आज दुपारी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. भाजपा सोडल्यानंतर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा मुंबईतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. दरम्यान, खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांपर्यंत आलाच नसल्याचे भाजपा प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -...अखेर खडसेंचा भाजपाला रामराम! प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला सदस्यत्वाचा राजीनामा
मध्यंतरी खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. मात्र, स्वत: खडसे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले होते. अखेरीस आज खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला.