मुंबई - मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारची निष्क्रीयता पुन्हा उघड झाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रास वेठीला धरणाऱ्या एसटी संपात तोडगा काढण्यातदेखील सरकारला पुरते अपयश आले आहे. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीस सामोरे जाण्याची तयारी भाजपने दाखविली असतानाही, पत्रकार परिषदा घेऊन राजकारण करण्याऱ्या शिवसेनेकडे सत्ता असूनही हिंमत नाही, हेच सिद्ध झाले आहे, अशी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे.
आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न -
१०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा अशा अनेक प्रश्नांपासून पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे संजय राऊत यांच्याकडून प्रसार माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असावा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.
राज्यापुढील समस्यांना सामोरे जाण्याची हिंमत नाही -
यावेळी बोलताना उपाध्ये यांनी सांगितले की, पुण्यात एका महिलेने शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करू न देण्यासाठी कोणी प्रयत्न केले हे समोर येणे आवश्यक आहे. तसेच कुचिक हे कोणाचे मानलेले भाऊ आहेत हेही जनतेला कळायला हवे. शिवसेनेच्या नेतृत्वाचाच कब्जा मिळविण्याच्या संजय राऊत यांच्या प्रयत्नांना वेसण घालण्यासाठीच पुन्हा विरोधकांच्या ऐक्याचा प्रयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केला असून राज्यापुढील समस्यांना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. राजकारण स्वतःवर केंद्रीत करण्याचा राऊतांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. मात्र, यातून राज्यासमोरील असंख्य प्रलंबित समस्या सुटणार नसल्याने आता आघाडीतील अन्य पक्षांनी तरी राज्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा उपाध्ये यांनी यावेळी व्यक्त केली.