मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र, आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात केले होते. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात मैत्रीचे संबंध पुन्हा जोडले जाणार असल्याची, चर्चा रंगली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक गुगली टाकली. भाजपचे आणि शिवसेनेचे संबंध अमिर खान आणि किरण राव यांच्यासारखे आहेत. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजयकी पटलावर तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार? अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा आमदार देवयानी फरांदे 'सरकार पाच वर्ष टिकेल'
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही अशी शक्यता पुन्हा एकदा दिसू लागली. दोन दिवसांपूर्वी अशिष शेलार आणि संजय राऊत यांच्यात एक बैठक झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात मैत्रीचे गाणे ऐकू येऊ लागले आहे. दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, नाना पटोले यांनी, ‘हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
'शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही'
फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी भूमिका मांडली. आता या दोघांच्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'आमच्यात शत्रूत्व नसले तरी, आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करू असे नाही. फडणवीस यांनी भाजपा आणि शिवसेनेमध्ये शत्रुत्व नसल्याचे वक्तव्य केले आहे. ते १०० टक्के खरे आहे. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की आम्ही एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू', अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? आणि कधी? या प्रश्नांचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल. विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला विविधी मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न केला जात असताना, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजप शिवसेनेकडून पुन्हा एकदा मैत्रीचे गीत गायले जात आहे. या प्रश्नवार भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील फडणवीस यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचे म्हटले आहे. आमचे जरुर मैत्रीचे संबंध आहेत. मात्र, आमच्यात वैचारीक मतभेद असल्याचे फरांदे म्हणाल्या आहेत.