महाराष्ट्र

maharashtra

आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?

By

Published : Sep 22, 2019, 8:42 AM IST

Updated : Sep 22, 2019, 10:04 AM IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती होणार की नाही, यावर अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही... शिवसेना फिफ्टी-फिफ्टी जागांवर ठाम आहे तर भाजप आपल्याला अधिक जागा देण्याची मागणी करत आहे. त्यामुळे अद्याप युतीवर शिक्कामोर्तब झालेले नाही...

भाजप शिवसेना युती

मुंबई -कलम ३७० रद्द केल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याचे भाजपने ठरवले आहे, यासाठी अमित शाह आज, रविवारी मुंबईत येत आहेत. सकाळी ११ वाजता गोरेगाव येथे त्यांचा कार्यक्रम आहे. शाह यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट ठरलेली नाही. मात्र युतीबाबत निश्चित काही तरी निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम; भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत

लोकसभा निवडणुकांमध्ये जागांचे सूत्र ठरविण्यात फारशा अडचणी नसल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत ऐनवेळी युती जाहीर करण्यात आली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकांसाठी २८८ जागांचे वाटप असल्याने तसेच त्यापैकी कोणत्या निम्म्या जागा वाटून घ्यायच्या याविषयी गोंधळ असल्याने दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या बैठका होणे अपेक्षित होते. मात्र शिवसेनेकडून उद्योग मंत्री सुभाष देसाई तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ही मंडळीच जागावाटपाची चर्चा करत असल्याचे, समजत होते. मात्र या जागावाटपाच्या चर्चेत इतर नेत्यांना स्थान नसल्याने पक्ष नेमक्या कोणत्या आणि किती जागा लढविणार आहे याचा थांगपत्ता यांच्यापैकी कोणालाही नाही.

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेसाठी निवडणूकीची घोषणा झाली आहे. मात्र युतीचे जागावाटप अजूनही झालेले नाही. त्यामुळे युतीचे नेमके काय होणार? हा प्रश्न कार्यकर्त्यांप्रमाणेच, महाराष्ट्राच्या जनतेपूढेही आहे. यामुळे आता रविवारी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात हा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा आहे.

भाजप शिवसेना युती

हेही वाचा... 'सेना-भाजप जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरलाय'

युतीचं घोडं अडतंय कुठे ?

जागावाटप हाच प्रमुख मुद्दा: शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'लोकसभा निवडणूक 2019' वेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत युतीचा फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिली, आणि त्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप झाल्यास युतीची घोषणा लवकरच करण्याचे, सांगितले होते. तसेच ठाकरेंना जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता, "युतीची चर्चा अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांची यादी ठरवतील आणि मी ती पक्षाच्या नेत्यांसमोर मांडेन." असे 'हतबलतायुक्त' उत्तर दिले होते. यामुळे जागावाटपाचा मुद्दा हाच युती होणे, अथवा न होणे यासाठी शिवसेनेकडून केंद्रस्थानी ठेवला जाईल हे नक्की.

भाजपचा प्रतिसाद

सेना भाजप या दोन्ही पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेत्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यात नागपूरमध्ये भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, "युती होणार, पण 135 जागांच्या जुन्या फॉर्म्युल्यावर नाही. भाजपची आमदारसंख्या पाहता सेनाही ते मान्य करेल" असे म्हटले होते. जिंकलेल्या जागा सोडणार नसल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले होते.

भाजप युती करेल की नाही, अशी धाकधूक आता शिवसेनेच्या गोटातही व्यक्त केली जात आहे. शिवसेनेशी युती केली नाही तरी भाजपला सहज मोठे बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करायची की नाही, असा विचार भाजपश्रेष्ठींच्या मनात डोकावू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने शिवसेनेशी युती करायचे ठरविले तरी जागावाटपाचे सूत्र भाजपचे पारडे जड करणारे ठरु शकते. भाजपने जिंकलेल्या १२३ जागा वगळून आणि अन्य छोट्या पक्षांसाठी काही जागा सोडून उरलेल्या जागांवरच आता वाटाघाटी होऊ शकते.

एकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव प्रत्यक्षपणे दिसून येत नसला, तरी तो तणाव असल्याचे दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या विधानांवर लक्षात येत आहे. स्वबळाची ताकद एकदा अनुभवलेले हे पक्ष युती कायम ठेवणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. राज्यात एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने जागावाटप निश्चित केले असताना, युतीचे जागावाटप मात्र अद्यापही ठरलेले नाही. अमित शाह रविवारी म्हणजेच, २२ सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. पण, त्यांच्या या दौऱ्यात त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याविषयी कोणतीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर याचे थेट पडसाद राजकीय पटलावर पाहायला मिळाले आहेत आणि शिवसेना- भाजप युतीचं काय? या एकाच प्रश्नाभवतीच संपूर्ण राजकीय चर्चा फिरत आहे.

हेही वाचा... भाजप मित्रपक्ष जिंकणार 220 जागा; अतुल भातखळकर यांचा विश्वास​​​​​​​

आतापर्यंत युतीने लढवलेल्या जागा, विजयी उमेदवार आणि मतांची टक्केवारी

शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. भाजपच्या कमळ या चिन्हावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी निवडणुक लढवली होती. पण युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचे सरकार आले. 1995ला विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेने 169 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या.

2014 विधानसभा

  • शिवसेना - 160 जागा, विजयी उमेदवार - 63, एकूण मतदान - 19.30 %
  • भाजप - 119 जागा, विजयी उमेदवार - 122, एकूण मतदान - 27.80 %

2009 विधानसभा

  • शिवसेना - 160 जागा, विजयी उमेदवार - 45, एकूण मतदान - 16.26 %
  • भाजप - 119 जागा, विजयी उमेदवार - 46, एकूण मतदान - 14.02 %

2004 विधानसभा

  • शिवसेना - 163 जागा, विजयी उमेदवार - 62, एकूण मतदान - 19.97 %
  • भाजप - 111 जागा, विजयी उमेदवार - 54, एकूण मतदान - 13.67 %
Last Updated : Sep 22, 2019, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details