मुंबई - महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक ( Legislative Council Election ) 20 जूनला होत आहे. 10 जागांसाठी होणार्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजपने बुधवारी (दि. 8 जून) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी दिली. मात्र, या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे.
अटीतटीची निवडणूक..? -महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विधान परिषदेची निवडणूक ही 20 जूनला होत आहे. यासाठी 2 जूनला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत तर 20 जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरली असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर होईल, अशी मुंडे समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले असून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपसोबत असलेल्या घटक पक्षातील उमेदवारांनाही डावलण्यात आले आहे. यामुळे यंदाची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.