मुंबई - महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात मागील आठवड्यापासून वातावरण तापत आहे. अनेक सर्वसामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना अवाजवी रक्कमेचे लाइटबिल पाठवल्याने त्यामध्ये तडजोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्यानं 'लाइटबिल' राजकारणाला सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने विरोधांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. त्यातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही सरकारचा निर्णय पुढे रेटल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष आहे. यामुद्द्यावरून विरोधीपक्षाने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. वाढीव वीज बिलांचा मुद्दा मार्गी न लावल्यास सोमवारपासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा भाजपाने दिला आहे.
मुंबईत महिला मोर्चा आक्रमक
मुंबई आणि सांगलीत याविरोधात भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत भाजपा महिला आघाडी रस्त्यावर उतरली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. भाजपाची महिला आघाडी महावितरणच्या कार्यालयावर धडकणार आहे. प्रकाशगड या महावितरणच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे. प्रकाशगडावर मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. याठिकाणी शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित आहेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
मनसेचा अल्टिमेटम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत वाढीव वीजबिलांचं प्रकरण मार्गी न लावल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांसह सर्वसमामान्यांचे वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली.