मुंबई- मुंबई महापालिका कारभाऱ्यांच्या दृष्टीने मुंबईत फक्त दोनच भाग आहेत, एक कला नगर आणि दुसरा वरळी, महापालिकेसाठी जे प्रकल्प येतात ते या दोन भागातच जातात. मग बाकीचे मुंबईकर काय सवतीचे आहेत का ? असा सवाल करत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली आहे. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर मुंबई भाजपा तर्फे गुरुवारी पालिकेच्या वाँर्ड ऑफिस कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले होते. एच पश्चिम पालिका कार्यालयावर भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील विविध प्रश्नांवरुन पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत ॲड. शेलार यांनी आम्ही मुंबईकरांचे प्रश्न मांडणार, कामांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागणार असा इशारा सत्ताधारी शिवसेनेला दिला.
'ते' दीड लाख कोटी रुपये गेले कुठे? कुठे गेला हा पैसा? मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 30 ते 34 हजार कोटींचा असून सरासरी 30 हजार कोटी जरी वर्षांचे पकडले तर पाच वर्षात मुंबईत 1 लाख 50 हजार कोटी रुपये खर्च झाले. मुंबईची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाख असून श्रीमंत माणूस पालिकेकडे काही मागायला येतच नाही. त्यामुळे 70 लाख लोकांसाठी गेल्या पाच वर्षात 1 लाख 50 हजार कोटी रुपये खर्च झाले असतील, तर शहरात ना रस्ते, ना पाणी, ना अन्य सुविधा दिसून येत नाहीत. मग हा पैसा कुठे गेला? असा सवाल करत या पैशांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल असा इशारा शेलार यांनी यावेळी शिवसेनाला दिला.
दोन चक्रीवादळे, ४ वेळा अतिवृष्टी -
मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर मुंबई भाजपा तर्फे गुरुवारी पालिकेच्या वाँर्ड ऑफिस कार्यालयांवर मोर्चा काढल्यानंतर यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले, त्यात मागील वर्षभराच्या काळात आलेल्या निसर्ग व तौक्ते ही दोन चक्रीवादळे, ४ वेळा झालेली अतिवृष्टी यामुळे मुंबई शहरातील झोपडपट्टी व चाळीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी मागणी करण्यात आली. मुंबईतील नागरिक आर्थिक अडचणीत असताना सुद्धा राज्य सरकारने किंवा ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या व दरवर्षी १६०० कोटी रुपये केवळ व्याजापोटी उत्पन्न असलेल्या मुंबई महानगर पालिकेकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही असा आरोप या भाजपाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांसाठी या मागण्या करण्यात आल्या असल्याचेही आंदोलक भाजपाकडून यावेळी सांगण्यात आले.
या आहेत मागण्या-
यामध्ये तौक्ते वादळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना तातडीने मदत देण्यात यावी. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना पाणीपट्टी, अग्नीशमन कर, अंतर्गत रस्ते कर आदींमध्ये किमान ५० टक्के सवलत देण्यात यावी. निवडणूक प्रचारावेळी आश्वासित केल्याप्रमाणे ५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ करावा.पुरेसे पाणी, खडेमुक्त रस्ते मिळालेच पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात भाजपा वांद्रे(प) विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत, नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, विरेंद्र म्हात्रे, तृणाल वाघ, प्रविण शिरसागर आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.