मुंबई -राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी भाजपाने आता 'प्रसारमाध्यम' अभियान हे हुकमी अस्त्र बाहेर काढले आहे. सरकारच्या विरोधात विविध माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर आता प्रसार माध्यमाद्वारे जनतेत सरकार विरोधात रोष निर्माण करण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे जाणकार पांडुरंग म्हस्के यांचे म्हणणे आहे.
भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसांमध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून काही नेत्यांच्या मागे तपासाचा ससेमिरा लावणे तसेच एसटीच्या आंदोलनामध्ये उतरणे. तसेच सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे पत्रकार परिषदा घेणे. यामुळे सरकार विरोधात भाजप किती आक्रमकपणे काम करते आहे याचा अंदाज येतो.
पत्रकार परिषदांची रेलचेल
राज्य सरकारला सत्ता स्थापन करून दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्य सरकारच्या कामाचे वाभाडे काढण्याचा निर्णय विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने घेतला आहे. त्यासाठी भाजपाने राज्यात विविध ठिकाणी सहा दिवसांमध्ये 48 पत्रकार परिषदा आयोजित केल्या आहेत.
प्रसारमाध्यमांमधून जनमताचा प्रयत्न
राज्य सरकारच्या विरोधात प्रभावी जनमत तयार करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषदांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या पत्रकार परिषदा घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, किरीट सोमैया, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्यासोबत स्थानिक महत्त्वाचे नेते पत्रकार परिषदा घेत आहेत. एकाच वेळी राज्यात सर्वत्र सरकार विरोधात बातम्या छापून येणे आणि त्यामुळे जनमत तयार होणे याला मदत होईल, असा भाजपाचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक पांडुरंग म्हस्के यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा -राज्यातील भाजप नेत्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण सुरू - राजकीय विश्लेषक