मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2022) नुकताच स्थायी समितीत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर करताना मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करणार नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी जाहीर केले. मात्र, थोड्यच वेळात पत्रकार परिषद घेत मालमत्ता करात १५ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी शिवसेनेने अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही असे म्हटले आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचा विश्वासघात करत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांनी केले आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी पत्रकार परिषदेत केली.
आयुक्तांचे वर्तन लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे -
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. त्यावेळी त्यांनी कोणतीही करवाढ करणार नाही असे म्हटले. मात्र त्यानंतर काही वेळातच पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी लवकरच मालमत्ता करात १५ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. महापालिका आयुक्तांचे हे वर्तन कायदा प्रथा-परंपरा आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे असून शिवसेनेने सर्वसामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. त्यांना जनता निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आयुक्तांच्या मनमानी वर्तणुकीला भारतीय जनता पक्ष तीव्र विरोध करेल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार राजहंस सिंह यांनी दिला. स्थायी समिती सदस्य, पक्ष नेता विनोद मिश्रा उपस्थित होते.