मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप पूर्णपणे सक्रिय झाला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शिवसेना विरोधात मुंबईत ( BJP Polkhol Campaign ) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये भाजपच्या या पोलखोल अभियानाला शिवसेनेकडून अप्रत्यक्ष विरोध होत असून या अभियानावरून भाजप व शिवसेनेत कुठे ना कुठे तरी वाद निर्माण होत आहेत. भाजपच्या या अभियानाने शिवसेनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन त्याचा फटका त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल, अशी चिंता व्यक्त केली जात असताना या अभियानाने मुंबईकरांना काय फायदा होऊ शकतो, हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे.
पोलखोल अभियानाने शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड? -पोलखोल अभियानावरून आता भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला आहे. चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाच्या रथाची अज्ञातांकडून तोडफोड केल्यानंतर भाजप याप्रश्नी आक्रमक झाला आहे. याबाबत ४ जणांना अटकही करण्यात आली असून त्यामध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचही सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दहिसर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाचा स्टेज बांधण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विरोध केल्याने तेथेसुद्धा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलखोल अभियानाने शिवसेनेचा मागील पंचवीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा काळा चिट्ठा जनतेसमोर उघडा पडेल ही भीती त्यांना सतावत असल्याचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितल आहे. त्याचबरोबर मुंबई पालिकेमधील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविषयी भाजप नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सुद्धा आवाज उठवला. परंतु सत्ताधारी शिवसेनेने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आता हा आवाज ते पोलखोल या अभियानांतर्गत जनतेमध्ये उघडपणे सांगत असल्याचे दरेकर म्हणाले.
पोलखोल अभियानाचा फायदा कोणाला? -शिवसेना व भाजप यांची मुंबई महानगरपालिकेतील युती तुटली व दोघे एकमेकांवर खापर फोडू लागले. परंतु शिवसेना व भाजप यांच्यामध्ये हा कलगीतुरा रंगलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विशेष पक्ष मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविषयी 'ब्र' काढायला सुद्धा तयार नाही. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा यापूर्वीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या निवडणुकीतील हालचालींवर विषयी काँग्रेस पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहे. भाजपने सुरू केलेल्या पोलखोल अभियानाचा फटका शिवसेनेला बसणार असला तरी त्याचा फायदा राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनाही होऊ शकतो. परंतु भाजपने सुरू केलेल्या पोलखोल अभियानाचा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला बसणार, अशी शंका वर्तवली जात आहे.