मुंबई- राज्यातल्या ठाकरे सरकारने भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी काम करायला सुरुवात केली. त्यादृष्टीने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचे सरकार असताना विरोधी पक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करण्यात येत होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही अशा प्रकारचा आरोप केला होता. त्यामुळे गृह विभागाने आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -गेल्या वर्षभरात देशात गोंधळ अन् गडबड, केंद्र सरकार मान्य करणार का वस्तुस्थिती?
भाजपची सत्ता असतानाच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांची फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे गृह विभागाने हा आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेलला मागील सरकारच्या काळात फोन टॅपिंगच्या तक्रारींवर कारवाई करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.