मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भाजपा ईडी, सीबीआय आयआयटीसारख्या शासकीय यंत्रणांचा वापर करते, असे विधान केले होते. शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी याविधानाची री ओढली.
शिवसेनेची पाऊले दिल्लीच्या दिशेने पडत आहेत. देशात आम्हाला विस्तार करायचा आहे. त्यासाठी संघर्ष करायची, अडचणींचा सामना करण्याची तयारी आहे. प्रत्येक राज्यात आम्ही निवडणुका लढवणार आहोत. आज यश मिळणार नाही, पण उद्या नक्की मिळेल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यात आहे. गोवा, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढत आहोत. दादरा नगर लहवेली लोकसभा निवडणूक जिंकली. आता दक्षिण गुजरात मध्ये काम सुरू केल्याचे राऊत म्हणाले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ईडी, सीबीआय आयटी सारख्या यंत्रणाचा वापर करण्यापेक्षा समोरासमोर मैदानात या, असे आव्हान दिले होते. राऊत यांनी या विधानाचे समर्थन करताना, 'वर्दी निकाल तेरे गली मे आ', या हिंदी सिनेमाचे डायलॉग मारत, ईडी, सीबीआय, आयटी ही भाजपची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात. हिम्मत असेल तर हे चिलखत काढून मैदानात या, नाही मातीत गाडलं, नाही लोळवल, तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही अशाप्रकारची भूमिका उद्धव ठाकरे यांनी सांगितले आम्ही त्या भूमिकेशी ठाम आणि सहमत आहोत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
तुम्ही अंगावर या, आम्ही तुम्हाला घाबरत नाही. विरोधात आहोत म्हणून खोट्या प्रकारात तुरुंगात टाकाल, आयटी सेलचा गैरवापर करून बदनामीची मोहीम चालवली किंवा हरेन पंड्या सारखी गोळी मारू शकता. कितीही काही केलं तरी तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही. एकदिवस हा डाव तुमच्यावर नक्की उलटेल, असेही राऊत म्हणाले.