मुंबई- मुंबईतील मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे एका इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेवरून आता भाजप नेते राम कदम यांनी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेनाशासित बीएमसीकडून केलेली योजनाबद्ध हत्या असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
तर हे मृत्यू रोखता आले असते- कदम
मालाड, मालवणी, अब्दुल हमीद रोड, मालवणी गेट नंबर ८, न्यू कलेक्टर कंपाउंड, प्लॉट नंबर ७२ या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीतील एक दुमजली घर शेजारील घरावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बाजूच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर राम कदम यांनी या दूर्घटनेतील 11 लोकांचा मृत्यूही शिवसेना शासित मुंबई महानगरपालिके कडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती, वसूलीचे धंदे थांबवलेले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते, असा आरोप केला आहे.
शिवसेना, मुंबईमहापालिका घेणार का या हत्येची जबाबदारी?
राम कदम म्हणाले की, आता या दुर्घटनेत ११ जणांचे जीव गेले आहेत. तर ७ जण जखमी आहेत. तसेच मृतामध्ये ८ बालकांचा समावेश आहे. यातील मृतांच्या जखमींच्या वारसांना काही लाख रुपयांची मदत जाहीर केली जाईल. मात्र त्या २ - ५ लाखांमुळे ते जीव परत येणार आहेत. जर वेळीच काळजी घेतली असती तर हे जीव वाचले असते. त्यामुळे त्यांच्या हत्येची जबाबादारी शिवसेना किंवा मुंबई महापालिका घेणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.