मुंबई -भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र, या नव्या पोर्टलच्या निर्मितीवरुन भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्याचे 'महास्वयम' पोर्टल असताना हे नवीन पोर्टल कशासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारमधील शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नवीन महाजॉब नावाचे पोर्टल कोट्यवधी रुपये खर्च करून बनवले. परंतु, अशा स्वरूपाचे पोर्टल राष्ट्रवादीकडे खाते असणाऱ्या नवाब मलिक यांच्या विभागामध्ये 'महास्वयम' या नावाने या आधीच कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे. मग नवीन पोर्टलची गरज काय? असा प्रश्न विचारत भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही का? असा टोला लगावला आहे.
भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -बेरोजगारांसाठी सरकारचे 'महाजॉब पोर्टल', नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक
महाविकासआघाडी सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांसाठी एक नवीन जॉब पोर्टल करोडो रुपये खर्च करून तयार केले आहे. अगोदरच सरकारचे राष्ट्रवादीकडे असणारे अल्पसंख्याक खात्याचे जॉबसाठीचे पोर्टल असताना नवीन पोर्टल शिवसेनेचे मंत्री असलेल्या विभागात सुरू करण्याचे कारण काय ? असा प्रश्न कदम यांनी विचारला. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. तरुणांना जॉब मिळाल्यावर दोन्ही पक्षांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे ? पोर्टलच्या निमित्ताने कोणाचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न आहे ? असे प्रश्न राम कदम यांनी विचारले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टीस नेमके काय कारण? कोरोना काळात पोलिसांचा कापलेला पगार द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारने याचे उत्तर द्यावे, असे भाजप नेते आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.