मुंबई- त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्यामुळे राज्यात हिंदू - मुस्लिम दंगली भडकल्या, असे असेल तर ते साफ चुकीचे आहे असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. कारण त्रिपुरामध्ये कुठेही मशिदीची तोडफोड झाली नाही. जर असे असेल तर त्याचा मला एक तरी फोटो दाखवावा असे आव्हान, नितेश राणे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रझा अकादमीला दिले. नितेश राणेंनी अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथे झालेल्या दंगलीवरुन राज्य सरकारला अनेक प्रश्न यावेळी केले.
१२ नोव्हेंबरला मोर्चे निघाले त्याकडे दुर्लक्ष का झाले?
महविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून जाणून बुजून काही घटना केल्या जात आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व अन्य मंत्र्यांकडून काही वक्तव्य केली जात आहेत.१३ नोव्हेंबरला अमरावतीत जो मोर्चा निघाला त्यामुळे दंगली झाल्या, असे सांगितले जात आहे. हे विश्व हिंदू परिषद (VHP), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) व भारतीय जनता पक्षाचे (BJP) लोक करत आहेत असे सांगितले जात आहे. पण १३ नोव्हेंबर पूर्वी काय झाले हे सुद्धा बघणे गरजेचे आहे, असे नितेश राणे म्हणाले.
१२ नोव्हेंबरला देगलुरला मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये भावना भडकवणारे फलक होते. हा मोर्चा रझा अकादमीच्यावतीने काढण्यात आला होता. त्रिपुरामध्ये हिंदू संघटनेकडून मशिद तोडली गेली असा एक तरी फोटो मला दाखवा, नितेश राणेंनी असे आव्हान रझा अकादमीला दिले आहे. ज्या कारणासाठी नांदेड, मालेगाव,अमरावतीमध्ये मोर्चे काढले गेले, त्याला काही कारणच नव्हते. कारण त्रिपुरामध्ये तसे काहीच झाले नाही, असा दावाही नितेश राणेंनी केला.
हेही वाचा : तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंसाचार - शरद पवारांचा भाजपवर निशाणा
लोकशाहीला न मानणारी रझा अकादमी
रझा अकादमी कट्टरपंथी संघटना म्हणून ओळखली जाते असे सांगत नितेश राणे म्हणाले, 'मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते. तिहेरी तलाकला रझा अकादमीने विरोध केला. करोना लसीकरणाला विरोध केला. लोकशाहीला न मानणारे हे लोक आहेत. त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. ते मोर्चे काढतात त्याला तुम्ही परवानगी देता.'
रझा अकादमीला सरकारचा पाठिंबा आहे, का असा सवाल करत राणे म्हणाले, 'मुंबई मध्ये सुद्धा आझाद मैदानात यांनीच मोर्चे काढले. १९९७ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारी हीच रझा अकादमी होती. रझा अकादमीला महविकास आघाडी सरकार चा पाठिंबा आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेश, आसाम मध्ये दंगे कोणी भडकावले तर ते रझा अकादमीने, मग संजय राऊत म्हणतात, रझा अकादमी दंगे भडकवूच शकत नाही.' असा टोमणाही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
हेही वाचा : Maharashtra violence हिंसक घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
राज्याने दखल घेतली नाही तर केंद्राकडे तक्रार करणार
देगलूरचा आमदार आज भाजपचा असता तर दंगल घडली नसती. त्रिपुराची चुकीची बातमी ट्विटरच्या माध्यमातून पसरवली गेली. लोकांच्या भावना भडकावल्या गेल्या. राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट करून त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. मग ते जबाबदार नाहीत का? ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्याबाबत चित्र निर्माण केले गेले, असे आमदार राणे म्हणाले.
१२ नोव्हेंबरला काँग्रेसचे नेते रझा अकादमीच्या नेत्यांना भेटायला गेले होते. पोलिसांनी १३ नोव्हेंबरला मोर्चावर लाठीचार्ज केला पण १२ नोव्हेंबरच्या मोर्चावर केला नाही. कारण त्यांना वरून आदेश देण्यात आले होते. या सर्वाबाबत योग्य ती कारवाई झाली पाहिजे. रझा अकादमी वर बंदी घाला. याच्यापुढे कुठेही हिंदुंवर अत्याचार झाला तर महाराष्ट्रात जो उद्रेक होईल त्याला महविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असे राणे म्हणाले.
खरे मर्द असाल तर रझाअकादमीच्या प्रमुखाला अटक करा. अर्जुन खोतकर यांनी जे भाषण केले ते चिथावणीखोर भाषण होते. मग त्यांना अटक का केली गेली नाही. सरकार रझा अकादमीवर बंदी घालणार आहे की नाही? जर राज्य सरकार कडून या विषयी काही कारवाई केली गेली नाही तर हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून एनआयए कडे देण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी न्यालयात जाणार असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.