नागपूर - विधानसभेत राज्य सरकारला विश्वासदर्शक ठरावाच्या सामना उद्या ( ३०जून ) रोजी करावा लागणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूरसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे हे देखील मुंबईकडे निघाले आहेत, त्याआधी त्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. सत्ता परिवर्तन होणे अटळ असल्याने भाजपच्या आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ( Krishna Khopde On Maharashtra Political Crisis )
आघाडी सरकार धोक्यात - राज्य सरकारच्या कामकाजामुळे नागपूरसह विदर्भावर प्रचंड अन्याय झाला आहे, निधी वाटपात देखील भेदभाव केला जात होता. केवळ भाजपचं नाही तर शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा निधी दिला जात नव्हता. हिंदुत्वांच्या नावावर निवडणूक लढवलेल्या शिवसेनेला आपला मुळ हेतू विसारल्यामुळे आज हे सरकार धोक्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
उद्या सरकारची अग्नी परीक्षा - भारतीय जनता पक्षासह काही अपक्षांनी राज्य सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला आहे,त्यामुळे सरकार धोक्यात अली आहे. राज्यपालांनी सरकारला 30 जून रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार उद्या राज्य सरकारची अग्नी परीक्षा होणार आहे.