मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (ED Arrested Nawab Malik) केली आहे. यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना अटक झाली तेव्हा सूडबुद्धी नव्हती का?, असा खोचक प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. तसेच मलिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून NCP आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल, बरेचजण गोत्यात येतील, असेही भातखळकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी -
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. याविषयी बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितल आहे की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर आंदोलन करतात याचा अर्थ महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही? तसेच नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे तेसुद्धा स्पष्ट करणे गरजेचे आहे. जर त्यांना काही आपत्ती असेल तर त्यांनी न्यायालयात जायला हवं. मुंबई शहराची बर्बादी करणाऱ्या दाऊदबरोबर नवाब मलिक यांचे संबंध आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय हे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जनतेला समजायला पाहिजे, असेही भातखळकर म्हणाले.