मुंबई - मनोरा आमदार निवासाचे 600 कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल 900 कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ 2 वर्षांच्या कालावधीत हा खर्च तब्बल 66 टक्क्यांनी कसा वाढला? असे प्रश्न करत, मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तत्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवले आहे.
'नक्कीच मोठा घोटाळा असण्याची शक्यता'
मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाकरिता केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनसोबत 600 कोटींचा करार केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल 250 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. 600 कोटी रुपयांच्या कामावर 300 कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.