मुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने, देशाच्या राजकारणातील कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय मातृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम वगळून) श्री. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, सुषमा स्वराज म्हणजे भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कुणाच्या आई, कुणाच्या भगिनी तर कुणाची मुलगी होत्या. त्यांचा खंबीरपणा आणि कर्तव्यकठोरपणा सर्व कार्यकत्यांसाठी आदर्शवत होता. राजकारणात त्यांनी आपल्या तत्त्वांना नेहमीच प्राधान्य दिले. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी जे संस्कार केले, त्या संस्कारांची शिदोरी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आयुष्याची मौलिक ठेव आहे.