मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब यांच्या अटकेनंतर राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. या मागणीसाठी भाजपाकडून आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात आला आहे. भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी भाजपाने केला. आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले.
तेव्हा काय उत्तर द्याल -
आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले, जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.