मुंबई:बोरीवली पश्चिम येथे दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाचं आयोजन करण्यात आलं असून स्वर्गवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर मोठ्या प्रमाणामध्ये दांडियाप्रेमींची गर्दी कालपासून दिसून येत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर फाल्गुनी पाठक (dandiyan queen falguni pathak) पुन्हा एकदा या रंगमंचावर परफॉर्म करताना दिसून आली. त्याचबरोबर फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर थिरकण्यासाठी संपूर्ण मुंबई आसुसलेली असताना बोरीवलीसारख्या गुजराती बहुल भागातगुजराती दांडिया प्रेमींची मोठी गर्दी या दांडियांमध्ये दिसून येत आहे.
BJP leaders enjoyed Dandiyan: गुजराती मतदारांसाठी बोरीवलीत भाजप नेत्यांमध्ये दांडियावरुन चढाओढ
शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि दहीहंडी, गणेशोत्सव या सणांवरील निर्बंध हटवले गेले. दोन्ही सण तब्बल २ वर्षांनी कोरोना संकटानंतर जल्लोषात साजरे केले गेले. याचा उत्साह महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या प्रमाणात होता. अशात आता कालपासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवाला (navratri festival) सुद्धा मोठ्या जल्लोषाला सुरुवात झाली असून बोरीवलीमध्ये भाजपचाच दांडियात वरचष्मा (BJP leaders enjoyed Dandiyan) दिसून येत आहे.
फाल्गुनी पाठोपाठ बोरीवली येथील भाजप आमदार सुनील राणे यांनी सिंगर किंजल दवे यांचा दांडिया आयोजित केला असून या दांडियाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दांडिया प्रेमी गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेष करून मागची २ वर्षे सोडली तर आतापर्यंत इतकी वर्ष बोरवली मध्ये फाल्गुनी पाठक यांच्या दांडियासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असताना आता त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून गायिका किंजल दवे (kinjal dave) या सुद्धा समोर उभ्या राहिलेल्या असताना फाल्गुनी पाठक व किंजल दवे या दोन्ही दांडियांचे आयोजन भाजपनेच केलं असल्याने आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं जात आहे.
दांडीयाचा जल्लोष-भाजपमध्ये उत्साह दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड या भागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. परंतु ज्या पद्धतीने फाल्गुनी पाठक, किंजल दवे, प्रीती - पिंकी यांच्या दांडियांचे आयोजन या परिसरामध्ये दिसून येत आहे. त्या अनुषंगाने भाजपने आतापासूनच फक्त गुजराती भाषिक नाहीत तर बहुभाषिक दांडिया प्रेमींना या दांडियाच्या आयोजनाद्वारे आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे खासदार गोपाळ शेट्टी,आमदार आशिष शेलार, भाजप नेते किरीट सोमय्या, मंत्री सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी पहिल्याच दिवशी या दांडियाच्या ठिकाणी हजेरी लावून हे सर्व आयोजन भाजपचाच असून आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत व या जल्लोषात तुमचं स्वागत आहे, असा संदेश जणू काही दिल्याचं दिसून येत आहे.