मुंबई -राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपा ( Shivsena BJP Dispute ) या दोन्ही पक्षात राजकीय वाद सूरु आहे. महापालिकेतही असाच वाद होत होता. मात्र, मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त ( Administrator For BMC ) केल्यावर भाजपा पालिकेत शांत झाली होती. मात्र, आता पुन्हा भाजपा आक्रमक भूमिका घेणार आहे. यामुळे पालिका प्रशासन, प्रशासक असलेले आयुक्त आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. मुंबई मनपात झालेल्या घोटाळ्याची माहिती गोळा केली जात असून हे सर्व प्रकार लवकरच पत्रकार परिषद घेऊन उघड केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेतील भाजपाचे पक्ष नेते विनोद मिश्रा ( BJP Leader Vinod Mishra ) यांनी दिली आहे.
शिवसेनेविरुद्ध भाजपा आक्रमक -मुंबई महापालिकेत 25 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र होते. मात्र 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. त्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणले. कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपाने वेळोवेळी आंदोलने केली. कोरोना रुग्ण कमी झाल्यावर पालिकेच्या बैठका ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष घ्याव्यात यासाठी, भाजपाच्या गटनेत्याला विरोधी पक्ष नेते घोषित करावे यासाठी भाजपाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेले होते.