मुंबई - माझा अर्धवट व्हिडिओ दाखवला जात आहे. माझ्या व्हिडिओचा आणि आंदोलनाचा काय संबंध असा अजब सवाल उपस्थित करत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवरच टीका केली आहे. एसटी आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असताना भाजपा यावरून राजकारण करत आहे. त्यांचेच नेते सत्तेत असताना एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगत आहेत, अशी टीका महाविकास आघाडीतून करण्यात येत आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी संबंधित व्हिडिओवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा -ST Strike : सुधीर मुनगंटीवार म्हणाले एसटीचे विलीनीकरण शक्यच नाही; व्हिडिओ होतोय व्हायरल
'व्हिडिओ अर्धवट'
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या आहेत. पण सरकार शिमगा करत बसले आहे. माझा अर्धवट व्हिडिओ दाखवला जात आहे. माझा व्हिडिओचा आणि आंदोलनाचा काय संबंध, असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. माझ्या मतदारसंघातील एका कर्मचाऱ्यांने माझ्यापुढे व्यथा मांडली तेव्हा मी सांगितले, की परिवहन विभागातून प्रस्ताव यावा लागेल. माझा जुना व्हिडिओ मोडूनतोडून दाखवला जात आहे. हा जाहीरनामा हर्बल वनस्पतींचे सेवन न करता तयार केला आहे. या जाहीरनाम्यात यांनी लिहिले आहे, की एसटी कर्मचाऱ्यांना शासनातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणार. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे आहोत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.