मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. त्यांच्या आरोपामुळे संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत किरीट सोमैया यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी या वादात उडी घेतली आहे. शिवसेना नेत्यांनी गोल गोल बोलण्यापेक्षा २१ सातबाऱ्यांवर बोलाव, असे आवाहन भाजप नेते राम कदम यांनी केले आहे.
राम कदम यांनी म्हणाले की, संजय राऊत त्रागा का करून घेत आहेत माहीत नाही. सोमैया यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. राऊतांनी सोमैया यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. थातूरमातूर गोलमोल उत्तरे देऊ नयेत. एवढेच नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री नसते, तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही? हे राऊतांनी सांगावे असे म्हटले आहे.
संजय राऊत यांचा किरीट सोमैया यांच्यावर शाब्दीक हल्ला-
किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण हे वेगळं आहे. आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, अनेक महिन्यापासून न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते काहीही बोलायला तयार नाहीत. २०१४ सालचे हे जमिनीचे कायदेशीर व्यवहार आहेत. २१ व्यवहार केले आहेत. ते दाखवावेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे. मराठी माणसांनी व्यवहार केले ते डोळ्यात खुपतंय का? किरीट सोमैया यांनी कितीही फडफड केली तरी, त्यातून काही निष्पन्न होणार नाही.