मुंबई -सचिन वाझे यांचे प्रकरण हे खूप मोठे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये सचिन वाझे हे हिमनगाचे फक्त एक टोक आहे. या हिमनगामध्ये अजून खूप अधिकारी, या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांची प्रकरणं बाहेर येतील. तसेच असे किती सचिन वाझे या सरकारमध्ये आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली आहे.
हेही वाचा -मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेतील तब्बल ६५ जणांचा समावेश
सरकारमध्ये किती सचिन वाझे?
सचिन वाझे या प्रकरणामध्ये खूप काही सत्य बाहेर येत आहे. त्यामुळे या सरकारमधल्या विविध खात्यांमध्ये असे किती सचिन वाझेसारखे अधिकारी आहेत हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी माधव भंडारी यांनी केली आहे.
सचिन वाझे यांच्या प्रकरणामध्ये सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच शंभर कोटी रुपये सचिन वाझेकडून गृहमंत्री गोळा करायचे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये अजून सत्य आगामी काळात बाहेर येणार आहे, असं माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले.
अधिकाऱ्यांमार्फत भ्रष्टाचार करण्याचे सरकारचे काम -
या सरकारमध्ये सचिन वाझे यांच्यासारखे अधिकारी हेरून पुन्हा त्यांना सेवेत घेतले जाते. त्यांच्याकडून अशाच भ्रष्टाचाराचे प्रकार हे सरकार करत आहेत. तसेच परमबीर सिंग यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हे प्रकरण खूप गंभीर आहे असं नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची गरज आता सरकारला आहे. तसेच या याचिकेमध्ये गृहमंत्र्यांना पक्षकार बनवा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या याचिकेमधून खूप काही सत्य बाहेर येणार, अशी प्रतिक्रिया माधव भंडारी यांनी दिली आहे.
हेही वाचा -राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट