मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. 2010पासून सदरची महिला आपल्याला व्हॉट्सअॅपवरून सतत मेसेज करून संपर्क साधून मैत्री करण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
आंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि कृष्णा हेगडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यासोबत माझा कुठलाही संबंध नसून 2010पासून सदर रेणु शर्मा नावाची महिला मला सतत फोन करून माझ्यासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या महिलेला बॉलिवूडमध्ये गायिका म्हणून नाव कमवायचे होते. त्यासाठी ती माझी मदत घेण्यासाठी सतत मला फोन करून संबंध ठेवण्यासाठी सांगत होती.6 जानेवारी 2020रोजीसुद्धा या महिलेने संपर्क करून यासंदर्भात संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. दरम्यान आपण आंबोली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देत असल्याचेही हेगडे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा नावाच्या महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले, की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करून देतो आणि बॉलिवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरून त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत, असा आरोप या महिलेने केला आहे.
कोण आहेत कृष्णा हेगडे?
कृष्णा हेगडे हे एकेकाळी मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते मानले जात होते. 2009मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली होती व ते निवडूनसुद्धा आले होते. मात्र 2014मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. काँग्रेस सोडत असताना त्यांनी संजय निरुपम यांच्यावर आरोप केला होता, की ते पक्षाशी निष्ठावंत असलेल्या नेत्यांना जाणून-बुजून अपमानास्पद वागणूक देत आहेत. यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई म्हणून कृष्णा हेगडे यांची ओळख आहे.
काय म्हणाले हेगडे?
धनंजय मुंडे यांच्यासोबत माझा कुठलाही संबंध नाही. मात्र याप्रकरणी आणखी कोणी बळी पडू नये, म्हणून मी तक्रार दाखल करत आहे. 6 व 7 जानेवारी रोजी पुन्हा एकदा रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.