मुंबई - सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांचाही आता नंबर लागेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच उद्धवा अजब तुझे सरकार, देशमुख, परमबीर सिंह फरार, पुढे अनिल परबही होणार, असा खोचक टोला सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरुन लगावला. शिवसेना याला कशाप्रकारे प्रतिउत्तर देते, हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.
किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मंत्री परब यांनी सोमैयांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. सोमैयांनी यावर प्रतिक्रिया देताना, परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागायला हवी. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चे रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचे कनेक्शन घेतले. तसेच वांद्रे येथे बेकायदेशीररित्या कार्यालय थाटले असा आरोप सोमैयांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकरणात लोकायुक्तांनी महिनाभरात म्हाडाने संबंधित बांधकामावर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या माजी मंत्री अनिल देशमुख पोलिसांच्या रडारवर आहेत. तसेच कालांतराने अनिल परब यांचाही नंबर असेल, असे सोमैयांनी म्हटले आहे. तसेच परब यांना आज ना उद्या कोर्टात जावेच लागेल. ते जेलमधून कोर्टात जाऊ शकतील. कारण सर्वांना कायदा समान आहे, असा टोला सोमैया यांनी परब यांना लगावला आहे.
घोटाळेबाजांचे नेतृत्व-
माझ्यासहित कुटुंबीयांना धमक्या मिळत आहेत. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही, असेही सोमैया यांनी ठणकावले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी टीकाही सोमय्या यांनी ट्विटरवरुन केली आहे.