मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( ED Summons Sanjay Raut )यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे 'अब संजय राऊत की बारी है', असे म्हणत भाजपनेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya Tweet ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील राजकारण आणखी तापणार आहे. दरम्यान संजय राऊत हे दिल्लीत असल्यामुळे ते आजच्या ईडी चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
किरीट सोमय्या संजय राऊत वाद -भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या हे कायम शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. त्यातच संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन हा वाद किती टोकाला पोहोचला आहे ते दाखवून दिले. शिवसेनेच्या विरोधामुळेच किरीट सोमय्या यांना मागील लोकसभेच्या निवडणुकीकत तिकीट देण्यात आले नव्हते, त्याचाही शिवसेना आणि सोमय्या यांच्या वादावर चांगलाच परिणाम झाला.
काय आहे प्रकरण -गोरेगाव येथील पत्राचाळीचा विकास करण्याचे हे प्रकरण आहे. या जागेचे 2011 साली एक ट्राय पार्टी मोडिफिकेशन झाले आणि त्यानुसार म्हाडाने बिल्डरांना जागा विकण्याची व बँकांकडून कर्ज घेण्याची देखील मुभा दिली. ही मुभा दिल्याने विकासकांनी जवळ जवळ 1064 कोटींचे लोन घेतले. 1039 करोड त्यांनी नऊ विकासकांना भाग करून ही जागा दिली. हे भाग करून विकले त्याचीच सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत.
काय आहेत संजय राऊत यांच्यावर आरोप -गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांवर ( Sanjay Raut in Goregaon Land corruption ) करण्यात येत आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले होते, असाही आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक ( Praveen Raut arrested by ED ) केली होती. तर संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर देखील 55 लाख रुपये जमा करण्यात आले होते.