मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या झाडाझडतीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे ते कोणाला सापडले, तर कळवा असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच त्यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे अनिल देशमुख पळाले तर नाही ना ? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
काटोल आणि वडविहिरा येथे आहे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित संपत्ती
अनिल देशमुख यांचे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे घर आहे. त्यासह नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. ईडीने या दोन्ही ठिकाणी छापेमारी केली आहे. वडविहिरा येथे देशमुख यांची शेती आहे, तर काटोल येथे जुना वाडा आहे. या अगोदर अनिल देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या कोटोल येथील वडलोपार्जित घरावर ईडीकडून छापेमारी झाली. त्यामुळे अटक होईल या भीतीने अनिल देशमुख नॉट रिचेबल झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. आतापर्यंत तीन वेळा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. ईडीकडून देण्यात आलेल्या दोन समन्स वेळी वेगवेगळ्या कारणांमुळे ही चौकशी पुढे ढकलावी यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रयत्न राहिला. मात्र 16 जुलै रोजी अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या आधी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील वरळी आणि गृहमंत्री असताना त्यांच्याकडे असलेल्या शासकीय निवासस्थानी छापेमारी झाली आहे. अनिल देशमुख यांच्या वरळीतील एक फ्लॅट आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या उरण भागामधील जमिनीसह स्थावर मालमत्ता ईडीकडून आता जप्त करण्यात आली आहे.
परमवीर सिंह यांच्या 100 कोटींच्या आरोपांमुळे देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा
मुंबईतील हॉटेल मालकांकडून शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. 20 मार्च रोजी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. या आरोपानंतर उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली. मुंबई, नागपूर आणि गृहमंत्री असताना त्यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानी हे धाड सत्र करण्यात आले.
या छापेमारीनंतर देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आला आहे. तर तिथेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजवलेला आहे. यासोबतच शंभर कोटींच्या आरोपाबाबत अनिल देशमुख यांची सीबीआयकडून देखील चौकशी करण्यात आली आहे.