मुंबई- शहरातील क्षेत्रातील कोविड-१९ सुविधा उभारलेल्या खासगी रुग्णालयामार्फत करोनाबाधित रुग्णांकडून आवाच्यासव्वा शुल्क आकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णांनीच समोर आणला. राज्य सरकार सर्व पालिका व खासगी रुग्णालय आपल्या ताब्यात घेत कोरोना रुग्णांसाठी सोयीसुविधा देत असल्याचे सांगत आहे. मात्र प्रशासनाच्या हद्दीतील खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत. सरकारने दिलेल्या अधिकारावरुन सुरू असलेली ही लूट थांबायला हवी. या लुटीवर कारवाई करायला हवी, अशी मागणी भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
शहरातील महापालिकेने करोना रुग्णांवरील उपचारासाठी विविध ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. या ठिकाणी नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत असे सांगितले जात आहे. मात्र मुंबई व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाने कोविड-१९ साठी अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयातर्फे उपचारासाठी दाखल केलेल्या करोनाबाधित रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारले जात आहे.