मुंबई- माझ्या रक्तात बंडखोरी नाही, मी पक्ष सोडणार नसल्याचे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले असले तरी भाजपमध्ये नाराजीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते विनोद तावडे, राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनीही मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा -VIDEO : एक वेळ अशी होती, की गोपीनाथ मुंडेही होते नाराज; काय म्हणाले होते ते तेव्हा, ऐका सविस्तर...
ससर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले असताना आता भाजपमध्ये नाराजी सत्र सुरू झाले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त ट्विटनंतर मुंडे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे चर्चिले जात असून अनेक भाजप नेते पंकजा मुंडे यांची भेट घेत आहेत. एकीकडे विनोद तावडे यांनी मुंडे यांची भेट घेतली असतानाच आता भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेही मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी पंकज मुंडे यांनी ट्विट करून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. याला अनुसरून ट्विट करतानाच त्यांनी मावळे या शब्दावर जोर दिला होता. त्यामुळे मुंडे भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, बंडखोरी आपल्या रक्तात नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आता खडसे आणि मुंडे यांच्यातली चर्चा कोणत्या दिशेला जाते यावर सर्वांचे लक्ष आहे.