मुंबई -आरे येथील मुंबई मेट्रोसाठी प्रस्तावित असलेला मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यास आज ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की हा प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलविल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खासगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले.
कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार.
आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाणार आहे. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? ही जनतेची किती मोठी ही दिशाभूल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.