मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या मोटारीचा मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी (दि.5 मार्च) मृतदेह आढळून आला. त्यानंतर याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यातच आता या प्रकरणात भाजपच्या इतर नेत्यांनी उडी मारली आहे. महाराष्ट्र्रात एकामागून एक प्रकरणे बाहेर येत आहेत, या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल ना, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
भाजप आक्रमक
प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस मोटार आढळून आली होती. यात जिलेटीनच्या 20 कांड्या आढळून आल्या होत्या. चौकशीनंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याची माहिती पुढे आली होती. तसेच मनसुख हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. शुक्रवारी (दि. 5) ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह घेण्यासाठी मनसुख धीरेन यांच्या नातेवाइकांनी नकार दिला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर करा, शवविच्छेदन करतानाचा व्हिडिओ सार्वजनिक करा आणि मगच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास व्यवस्थित न झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानभवनात उमटले होते. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव पुढे करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.