मुंबई -खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp Leader Chandrakant Patil ) यांनी घुमजाव केले आहे. आपले वक्तव्य सहज होते, त्याच्यात सुप्रिया सुळे यांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.
बुधवारी ( 25 मे ) चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण मिळवता येत नसेल, भांडता येत नसेल तर घरी जावं आणि स्वयंपाक करावे, असे सुप्रिया सुळेंना उद्देशून वक्तव्य केले होते. यावरून समाज माध्यमांमध्ये आणि राजकीय स्तरावर चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केले जात आहे. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनीही याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, मी असे म्हणालो होतो की जर त्यांना आरक्षण मिळवता येत नसेल, तर खासदार म्हणून मिरवण्यापेक्षा त्यांनी घरी जावे. ग्रामीण भाषेमध्ये जमत नसेल तर घरी जा, असे बोललो. मी कोणत्याही पद्धतीने त्यांचा अनादर करू इच्छित नाही किंवा त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे.
आता अटक होण्याची प्रतीक्षा -राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती अनिल परब यांना अटक होण्याची. अनिल परब यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील अन्य नेतेही लवकरच गजाआड जातील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
हेही वाचा -मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे