मुंबई -भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयांमध्ये एक पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप या सगळ्या प्रश्नांवर उत्तरे देत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होत आहे. त्याचा निकाल हा आरक्षणाच्या बाजूने यावा, यासाठी प्रार्थना देखील चंद्रकांत पाटील यांनी केली, अशी माहिती त्यांनी दिली.
न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमजोर -
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये रोज या संदर्भातली सुनावणी होत आहे. परंतु सरकार या सुनावणीच्या दरम्यान उदासीन आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट योग्य पद्धतीने सुप्रीम कोर्टात मांडलेला नसल्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान अडथळा होत आहे. सरकार आपली बाजू मांडण्यासाठी कुठेतरी कमजोर पडत आहे, असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण कितपत टिकवणार, याकडे आता सगळ्यांची नजर आहे.