मुंबई- विरोधकांनी म्हणजे भाजपने कांजूरमार्गच्या कारशेडच्या बाबतीत केंद्र सरकारशी बोलावे, हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला म्हणजे खोटारडेपणाचा आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा, संवेदनाहीनतेचा पुरावा असल्याची घणाघाती टीका मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुळातच कांजूरमार्गच्या जागेवर अनेक दावे प्रलंबित आहेत. दिवाणी न्यायालयामध्ये यासंदर्भातले दावे खासगी विकासकांचे प्रलंबित आहेत, हे सगळं लपवून ठेवून घाईगडबडीत, गुपचूप आणि मुख्यतः कायदा पूर्णतः धाब्यावर बसवून ही जमीन हस्तांतरित करण्याचा खटाटोप मान. मुख्यमंत्र्यांनी पुत्रप्रेमापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी केला. तो उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगलट आल्यामुळेच मुख्यमंत्री असा शहाजोगपणाचा आणि खोटा पवित्रा घेत असल्याचे श्री. भातखळकर यांनी म्हटले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मेट्रो कारशेडच्या निमित्ताने अनेक दावे केले. हे दावे पूर्णतः अशास्त्रीय असून वस्तुस्थितीला सोडून आहेत. मुळातच सत्तेवर आल्या आल्या आरेमधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, त्याचवेळेला कांजूरमार्गमध्ये किंवा अन्य कुठे पर्यायी जागा मिळते का याची चाचपणी करायला सुरुवात केली. पण त्यांनीच नेमलेल्या सौनक समितीने आरेमध्येच कारशेड करणे कसे योग्य आहे हे विस्तृतपणे सांगितल्यानंतर सुद्धा हा समितीचा अहवाल कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी फेटाळला हे त्यांनी जनतेला आज किंवा किंवा किमान विधानसभेत सांगण्याची आवश्यकता होती. पण कुठलेही योग्य उत्तर नसल्यामुळेच आणि केवळ अहंकारातून हा निर्णय घेतल्यामुळे अहवाल तर जनतेपासून लपवून ठेवला, पण त्याचबरोबर आज सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात 'खोट बोल पण रेटून बोल' अशा पद्धतीने दुर्दैवाने मान. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहेत. आरेच्या कारशेडमध्ये स्टॅबिलायजेशनचा प्रकल्प नसल्याचे त्यांचे म्हणणे म्हणजे या विषयात ते किती अज्ञानी आहेत हेच यातून स्पष्ट होते. या सर्व गोष्टींचा उल्लेख सौनक समितीने आपल्या रिपोर्ट मध्ये केलेला असताना सुद्धा मुख्यमंत्री इतकं अत्यंत चुकीचं आणि धडधडीत खोटे बोलत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
तेव्हा पंतप्रधानांना फोन करू शकतात तर मग..