मुंबई- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार ( BJP Leader Ashish Shelar ) यांच्या विरोध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे. यावर सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी हा वाद ( Shelar and Pednekar Dispute ) सामंजस्याने मिटवावा तसेच प्रतिष्ठित व्यक्तींबाबत बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. तसेच याप्रकरणी महापौर आणि राज्य सरकारने आपले म्हणणे दोन आठवड्यात सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे नेमका वाद -मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ येथे नोव्हेंबरमध्ये सिलिंडर स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) होऊन 4 जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार करताना हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले असून डॉक्टरला बडतर्फ आणि नर्सचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेतील तिघांचा मृत्यू झाला असून पाच वर्षाचा एक मुलगा जिवंत आहे. जखमींना पाहण्यासाठी मुंबईच्या महापौर 72 तासांनी पोहोचल्याने भाजपने यावर टीका केली होती. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर टीका केली होती. टीका करताना महापौरांबाबत शेलार यांनी काही आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला होता. तसेच महापौरांनी महिला शिवसैनिकांसोबत जाऊन मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलार यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शेलार यांना जामीनर मिळाला आहे.