मुंबई -महावितरणची थकबाकी वाढण्यास कोरोनापेक्षाही भाजपची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. भाजपची सत्ता असताना वीज बिल वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमुळेच महावितरण आर्थिक संकटात सापडली असल्याचे प्रत्युत्तर डॉ. राऊत यांनी दिले आहे. तसेच राज्याला कर्ज देताना बँकेपेक्षा जास्त व्याज दर आकारणारे भाजपचे केंद्रातील सरकार हे खरे सावकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली. त्या काळात ना कोरोना होता,ना आजच्या सारखे आर्थिक संकट तरीही वीज बिल ग्राहकांना विशेष सवलती देऊन थकित बिल वसूल का केले नाही, असा प्रश्न डॉ. राऊत यांनी विचारला आहे.
"राज्याच्या वीज क्षेत्रासाठी आम्ही आर्थिक अनुदान मागितले असता केंद्र सरकार आम्हाला कर्ज घ्या म्हणतेय. बँका 6 ते 7 टक्क्यांनी कर्ज देत असताना केंद्र सरकार मात्र 10.11 टक्क्यांनी कर्ज देऊ केले आहे. मग खरे सावकार तर भाजपचे केंद्रातील सरकार आहे असे म्हटले तर चुकीचे ठरेल का? भाजपची सत्ता राज्यात असताना लातूर येथे नवे मीटर बसवून नंतर चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे वीज बिल वसुली करण्यात आली. ही सावकारी नव्हती का?," अशी टीकाही त्यांनी केली आहे.
भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरण डबघाईला
"कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, हे खरे आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा बसला आहे. सरासरीची भाषा करणारे, आंदोलनाचे इशारे देणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांची सत्ता असताना वीज बिल वसुली करण्यासाठी आपली सरासरी कार्यक्षमता दाखवली असती तर आज हा वीज बिल थकबाकीचा डोंगर उभा राहिला नसता. मार्च 2014 मध्ये 14,154 कोटींवर असलेली महावितरणची सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी मार्च 2020 ला 51,146 कोटींवर पोचली. याचा अर्थ भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी तब्बल 37 हजार कोटींनी वाढली आहे. म्हणजेच भाजप सरकारच्या काळात दरवर्षी 7 हजार कोटींनी ही थकबाकी वाढली. यावरून भाजपची कार्यक्षमता सिद्ध होते," अश्या शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.