महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपा हा महान पक्ष आहे, ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात - संजय राऊत

नारायण राणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहून काम करावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही भाजपाला सुनावले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Aug 26, 2021, 3:20 PM IST

मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सतत घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता संजय राऊत यांना त्यांचा भूवनेश्वर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतावे लागले आहे. मुंबईत पाऊल ठेवताच राऊत यांनी पुन्हा भाजप आणि नारायण राणे यांच्यावर तोफ डागली. नारायण राणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहून काम करावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही भाजपाला सुनावले. भाजप हा फार महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात, असा खोचक टोला राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला.

काय म्हणाले संजय राऊत -

तुम्ही केंद्रातील मंत्री आहात. त्यामुळे आधी देश समजून घ्या, जे काम आहे ते करा, राज्यात येऊन बकाल आणि बकवास बोलू नका, अशी टीका संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे. तसेच नारायण राणे यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अंगावर याल तर ही शिवसेना आहे, अशा शब्दात त्यांनी राणे यांना इशारा दिला. केंद्रीय मंत्रीपदावर राहून बकाल बडबड करू नका, नाहीतर महाराष्ट्रातून नामशेष व्हाल. राज्यात देवेंद्र फडणवीस यांना धमकीचे पत्र काही वर्षांपूर्वी आले होते, ते लोक अजूनही तुरूंगात आहेत, असेही ते म्हणाले.

अनिल परब यांचे समर्थन -

राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात आता भाजपा आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अनिल परब यांच्या समर्थनातदेखील महाविकास आघाडीचे नेते उतरताना दिसत आहेत. संजय राऊत यांनीदेखील अनिल परब यांच्या भूमिकेचे समर्थन केलेले आहे, ते पालकमंत्री आहेत, असे त्यांनी सांगितले.

अग्रलेखाची जबाबदारी माझी -

दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन राज्यातील विरोधीपक्ष भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्यामुळे अग्रलेखाची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले.

'..मग ती कारवाईसुद्धा सुडाच्या भावेनेने' -

जर विरोधी पक्षाच्यामते ही कारवाई सुडाच्या भावेनेने असेल तर अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईदेखील सूडाच्या भावनेने झालेल्या आहेत. एकंदरीतच हा विषय न्यायालयाच्या अधीन असल्याने त्याबाबत चर्चा करता येणार नाही. पोलिसांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले नाही. फडणवीस यांना सुद्धा धमकीचा निनावी पत्र आले होते. तेंव्हा आरोपींना अटक झाली होती.
प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना जर धमकी देत असेल तर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे विरोधीपक्षाने सुडबुद्धीची व्याख्या समजून घेतली पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचा - राणे हे 'नॉर्मल' मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले, भाजपने शहाणे व्हावे; सामनातून सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details