मुंबई:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूसाठी स्वराज्याची स्थापना केली, असे विधान केले. मलिकांनी या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, हिंदूवी या शब्दाचा खेळ भाजपने खेळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मदारी मेहत्तर तोफखान्याचे सरदार होते. व इतर प्रमुख दलाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलेले नाही. भाजपचे लोक काही लोकांना पुढे करुन चुकीचा इतिहास सांगत आहेत. या देशाचा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत गैरसमज निर्माण करत आहेत. हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दाचा अर्थ भाजपला कळत नाही, त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ सुरु आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
BJP is creating Misunderstanding : भाजप शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज निर्माण करत आहे - मलिक
हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदूसाठी स्थापन केल्याचा अजब दावा, भाजपकडून करण्यात आला. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik) यांनी भाजपने हिंदवी आणि हिंदुवी स्वराज्याचा अर्थ शब्दकोशात तपासून पहावा असा सल्ला देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजपकडून गैरसमज (Misunderstanding) निर्माण केला जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला
लोकशाही संपवू देणार नाही
पाच राज्यात निवडणूका होणार आहेत. यामाध्यमातून भाजपची किती शक्ती राहिली आहे. किती लोक पसंती देतात हे स्पष्ट होईल, ५० वर्ष आम्हीच राहू याचा अर्थ लोकशाही संपवायची आहे, असा अर्थ होतो. देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही, असे मलिक यांनी ठणकावले.
एकतर्फी निर्णय जैतापूर वासियांवर लादू नये
पूर्वीच्या सरकारने जैतापूर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकांचा विरोध असल्याने तो प्रकल्प पुढे गेला नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादीत होत नाही, लोकांची शंका दूर होत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करणे योग्य नाही. तसेच बळजबरीने कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जैतापूर वासियांवर कोणताही निर्णय एकतर्फी निर्णय लादू नये, अशी भूमिका मलिक यांनी स्पष्ट केली.