भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष, त्यामुळेच मुंडे, खडसेंचा वापर करुन त्यांना डावलले - नाना पटोले
भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले. झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई -भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले. झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते, असा संशय येतो. भाजप हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुख्य मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न -
पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे. मात्र मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. त्यामुळे या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे. चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे, या महत्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
विरोधकांचा सरकार पडण्याचा डाव -
मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे. पण त्यात विरोधकांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहीम राबवली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. १०० कोटी रुपयांचे वसुली प्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही, तसेच अँटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास का केला जात नाही? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.