मुंबई - आपला एकही उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात नसताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत, असा प्रश्न भाजपला पडला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
राज ठाकरेंच्या प्रचार सभा कोणासाठी आहेत. या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवायचा? याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने द्यावी, अशी मागणी करणारे पत्र भाजप महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांना लिहले आहे.
राज ठाकरेंच्या प्रचारसभा कोणासाठी? या सभांमधून राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचार अप्रत्यक्षपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवित नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला जावा, असा सवाल तावडे यांनी पत्रातून केला आहे.
या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नाव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परंतु, राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे सभांच्या ठिकाणी निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असे तावडे यांनी म्हटले आहे.