मुंबई -धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून त्यांनी केली.
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पोलिसांकडून मुलांना मारहाण करणे हा मस्तवालपणा आहे, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी तसेच या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सहानुभूतीने दखल घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.