मुंबई - पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्याकांड प्रकरणात कोणतीही धार्मिक बाजू नसल्याचे गुन्हे शाखेने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाने या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. अंतर्यामी सरकारने आधीच ठरवले होते, की हे अफवेमुळे झाले आहे. तसाच निकाल सध्या येत आहे. पण आमची मागणी आहे, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, असे भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
भाजपा आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया... पालघर येथील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५०हून अधिक जणांना आरोपी करण्यात आले आहे. 'लोक अफवेला बळी पडल्यामुळे हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारवर भाजप नेत्यांनी टीका केली आहे.
हेही वाचा -गडचिंचले हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल
पालघर घटनेप्रकरणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री यांनी कोणतीही माहिती न घेता देखील म्हटले होते, की हे अफवेमुळे घडले आहे. आमचा महाराष्ट्रातील पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. पण महाराष्ट्र पोलीस ज्यांच्या अखत्यारीत काम करतात, त्यांनी आधीच घोषित केले की अफवेमुळे घडले आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर असे निष्कर्ष कोर्टात निघाले आहे. देशातील लोकांचा आणि समस्त साधू संतांचा भावना तीव्र आहेत. त्यांनी अगोदरच हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली. मग हे सरकार प्रकरण सिबीआयकडे का देत नाहीत, असा सवाल भाजपाचे नेते राम कदम यांनी उपस्थित करत हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी केली आहे.
काय होते प्रकरण?
एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला पालघरमधील गडचिंचोले गावात महंत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज या दोन साधूंसह त्यांचा कार चालक नीलेश तेलगडे याची जमावाने लाठ्याकाठ्या आणि दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे देशभरात राजकीय वादळ सुरु झाले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर त्यानंतर जोरदार टीका झाली होती. तसेच, विश्व हिंदू परिषदेने सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता