मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई का नाही, असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथील आपल्या कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामाची तक्रार करूनही म्हाडा प्रशासन कारवाई करत नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा - भाजपची मागणी मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा - भाजपची मागणी गांधीनगर वांद्रे येथील इमारत 57 व 58 यामधील मोकळ्या जागेत महाविकासआघाडी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार विलास सगळे नामक व्यक्तीने 2019 साली केलेली होती. याबाबत म्हाडा प्रशासनाने परब यांना नोटीस बजावलेली असतानाही त्यांनी त्याला काही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर म्हाडाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाला पत्राद्वारे केलेली आहे. ज्याप्रकारे अभिनेत्री कंगनाच्या या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला, त्याचप्रकारे सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावरही हातोडा चालवावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
यासंदर्भात सोमय्या यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर, म्हाडाने आपण वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या जागेवरील दोन हजार चौरस फूट अनधिकृत कार्यालयासाठी मंत्र्यांना नोटीस बजावली असून, ते काढायला सांगितले आहे, असे सांगितले. पण अद्याप त्यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले नाही, असेही म्हाडा अधिकाऱ्यांनी सोमय्या यांना सांगितले.. त्यामुळे परब यांच्या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करा. सध्या या बांधकामाची काय स्थिती आहे, याविषयी अधिक माहिती द्या, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी म्हाडाला पत्राद्वारे केलेली आहे.
या अनधिकृत बांधकामासंदर्भात मंत्री परब यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयाच्याअनधिकृतबांधकामावर पालिकेने कारवाई केली, अशाच प्रकारची कारवाई म्हाडा अनिल परब यांच्या या बांधकामावर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.